बीड : गेवराई विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मिळवली आहे. पहिल्या यादीत बदामराव पंडित यांचे नाव घेत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपचे नाराज आ. लक्ष्मण पवारही शरद पवार गटाच्या संपर्कात राहून तुतारी वाजविण्याच्या तयारीत होते. परंतु, आता ठाकरे गटाला जागा मिळाल्याने पवार मध्येच लटकले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महायुतीकडून बदामराव यांचे पुतणे विजयसिंह पंडित उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर काका-पुतण्या अशी लढत होऊ शकते. सध्या तरी या मतदारसंघात उमेदवारीवरून ट्विस्ट पहायला मिळत आहे.
महायुतीकडून बुधवारी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये परळीतून धनंजय मुंडे तर माजलगावातून प्रकाश सोळंके यांना पुन्हा उमेदवारी दिली. गेवराईमधून अजित पवार गटाकडून जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित इच्छुक आहेत. परंतु, त्यांचे पहिल्या यादीत नाव आले नाही. तर, दुसऱ्या बाजूला दुपारनंतर ठाकरे गटानेही पहिली यादी जाहीर केली. यामध्ये गेवराईतून माजी मंत्री बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर ते महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवारांच्या संपर्कात होते. विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, असे सर्वांना वाटत असतानाच बुधवारी ठाकरे गटाने बदामराव पंडित यांचे नाव जाहीर केले. यामुळे आता लक्ष्मण पवार यांना भाजपमध्ये परत जातानाही अडचण होणार आणि इकडे महाविकास आघाडीकडूनही दुसऱ्यालाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता आ. पवार अपक्ष लढणार की विश्रांती घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
२०१९ ला पुतण्याला बसला फटका२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित हेच विजयी होतील, असे वाटत होते. परंतु, या मतदारसंघात लक्ष्मण पवार, विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित अशी तिरंगी लढत झाली. विजयसिंह यांची मते बदामराव यांच्याकडे गेल्याने लक्ष्मण पवार यांना फायदा झाला आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. यावेळी देखील पंडित काका-पुतण्या तयारी करत होते. यामध्ये काकाने उमेदवारी मिळवली आहे, परंतु पुतण्या अजूनही प्रतीक्षेत आहे. पवारांनीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे यावेळी आता काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.