बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे तसेच बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस.देशमुख यांना सेवेतून काढण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक (लातूर) यांनी जिल्हा बॅँकेच्या समितीला दिले आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्याबाबत दिलेल्या निर्देशाचे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अनुपालन न केल्यामुळे विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी १९ डिसेंबर रोजी हा आदेश दिला. या संदर्भात शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी तक्रार केली होती. त्यानुसार सहकार कायदा १९६० मधील कलम ७९(१) नुसार दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली.बँक सत्ताधा-यांना दणकाबीड जिल्हा बँकेची २०१६ पासून आर्थिक परिस्थिती सुधारत गेल्याने तसेच बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या गरजेनुसार ठेवी अदा केल्याने विश्वासार्हता निर्माण झाली होती. मागील ४ वर्षांपासून सातत्याने नफ्यात राहणा-या जिल्हा बँकेची आर्थिक बाजू सक्षम होत असतानाच सहकार अधिकाºयांचा हा निर्णय आला आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर जिल्हा बँकेबाबत आलेल्या या निर्णयामुळे बँकेवर वर्चस्व असलेल्या राजकीय नेत्यांना हा मोठा धक्का असल्याचे राजकीय क्षेत्रातून बोलले जात आहे.बँकेच्या हितासाठीच सातत्याने प्रयत्न केले : सारडाया संदर्भात आदित्य सारडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १५ मे २०१५ रोजी बॅँकेचा नाबार्डचा क वर्ग होता. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर बॅँकेला नाबार्डचा ब दर्जा मिळाला. मार्च २०१९ अखेरची बॅँकेची नाबार्ड तपासणी झाली, तिचा आॅडीट वर्ग अप्राप्त असलातरी नाबार्डच्या अधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. बॅँकेला मार्च २०१५ अखेर २ कोटी २३ लाख रुपये तोटा होता. मात्र ,२०१६ अखेर बॅँकेला १ कोटी ८८ लाख रुपये नफा झाला. मार्च २०१७ अखेर २१ कोटी ८ लाख रुपये, तर मार्च २०१८ अखेर १८ कोटी ५१ लाख रुपये तर मार्च २०१९ अखेर २ कोटी ६ लाख रुपये नफा झाला. बॅँक सातत्याने चार वर्षे नफ्यात राहिली. बॅँकेचा व्यवस्थापन खर्च नियमानुसार अडीच टक्के करता येतो. मात्र बीड जिल्हा बॅँकेने व्यवस्थापनावर आतापर्यंत केवळ ०.८४ टक्के खर्च केला आहे. तर सीआरएआरचे आदर्श प्रमाण ९ टक्के असताना बीड बॅँकेने हे प्रमाण १६.८८ टक्के राखले. सीआरआर व एसएलआरचे प्रमाणही नियमानुसार राखले आहे. बॅँकेचा नेटवर्थ १४७ कोटी २१ लाख एवढे आहे. १५ मे २०१५ पासून बॅँकेच्या ठेवीदारांना त्याच्या गरजेनुसार ठेवी अदा केल्याने ठेवीदार आणि खातेधारकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली. तर ठेवींबाबत कोणाचीही तक्रार नसल्याचेही सारडा म्हणाले. बॅँक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कशी राहील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे सारडा यांनी सांगितले.
बीड जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष बडतर्फ; सीईओंना सेवेतून काढण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:02 AM
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे तसेच बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस.देशमुख यांना सेवेतून काढण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक (लातूर) यांनी जिल्हा बॅँकेच्या समितीला दिले आहे.
ठळक मुद्देविभागीय सहनिबंधकांचा निर्णय : प्रोत्साहन अनुदान वाटपात निर्देशाप्रमाणे अनुपालन केले नसल्याचा ठपका