अंबाजोगाई (बीड) : राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनुसार त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
बाळासाहेब दोडतले हे अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथील आहेत. मंत्री महादेव जानकर यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वी ते रासप कडून बीड जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. मराठवाड्यात रासपची वाढ करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यानंतर त्यांची रासपच्या मुख्य महासचिवपदी निवड करण्यात आली. जानकर यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर दोडतले यांच्याकडेही मोठी जबाबदारी येईल अशी अपेक्षा होतीच. त्यानुसार त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे आदेश आज गुरुवारी शासनाकडून काढण्यात आले.