बीड - सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे टाकण्याची प्रकिया सुरु आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी पीकविमा जमा झाला आहे. विशेष म्हणजे नांदूरघाट येथील 663 शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ 1 रुपयाची रक्कम पीकविमा म्हणून जमा झाली आहे. यावरुन, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही शेतकऱ्यांची सुलतानी थट्टा असल्याचे म्हटले.
बीड जिल्हा नेहमीच दुष्काळी आणि कमी पर्जन्यवृष्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कमी पर्जन्यवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात अनेकदा नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांच्या या नुकसानाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरु करण्यात आली. मात्र, सरकारच्या या योजनेतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टाच झाल्याचे दिसून येते. कारण, बी़ड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा 265 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला. पण, येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी रक्कम पीकविमा स्वरुपात जमा झाली आहे. नांदूरघाट येथील 663 शेतकऱ्यांना 1 रुपया तर 187 शेतकऱ्यांना 2 रुपये मंजूर झाले आहेत. तसेच 25 शेतकऱ्यांना 3 रुपये, 12 शेतकऱ्यांना 4 रुपये, 26 शेतकऱ्यांना 5 रुपये, एका शेतकऱ्याला 6 रुपये, दोन शेतकऱ्याला 9 रुपये मंजूर झाले आहेत. म्हणजेच 900 च्या जवळपास शेतकऱ्यांना 10 रुपयांपेक्षाही कमी रकमेचा विमा मिळाला आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन शेतकऱ्यांनी ही सुलतानी थट्टा असल्याचे म्हटले आहे.