कडा ( बीड ) - लाॅकडाऊन काळात तीस ते चाळीस रूपये किलोने भाव मिळत असल्याने शेरी येथील शेतकऱ्याने ३० गुंठे शेतात कोबीची लागवड केली. मात्र आता बाजारात कोबीस केवळ दोन ते तीन रूपये किलो भाव मिळत आहेत. यामुळे हतबल शेतकऱ्याने चक्क संपूर्ण कोबी पिकावर रोटर फिरवला आहे. कोबीची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याची व्यथा यावेळी या शेतकऱ्याने मांडली.
बाळासाहेब महाडिक हे शिक्षक असून आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे शेती ही करतात. लाॅकडाऊन काळात कोबीला चांगला भाव मिळत असल्याने त्यांनी देखील कोबी शेती करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ३० गुंठे शेतात घरीच रोपे तयार करून कोबीची लागवड केली. चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी शाळेचे काम पाहून शेतात कष्ट केले. मात्र, बाजारात कोबीस चक्क दोन ते तीन रूपये किलो भाव मिळत आहे. लागवडीस १७ हजार रूपये खर्च आला असून यातून केवळ ४ हजार उत्पन्न मिळणार होते. त्यामुळे हतबल होत रोटर फिरवून कोबीचे संपूर्ण पिक नष्ट केल्याचे शेतकरी बाळासाहेब महाडिक यांनी सांगितले.