बीड : राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी आहे. बीडमध्येही याची अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा बीड पालिकेकडून केला जात आहे. परंतु असे असले तरी बीड शहरात दररोज तब्बल दीड टन प्लास्टिक कचरा निघत आहे. एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे सामान्यांवर कारवाई करून धनदांडग्यांना पाठबळ दिल्याचे अनेकदा समोर आलेले आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी १० फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन १ मे पर्यंत महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करण्याच्या सुचना केल्या. त्याप्रमाणे विभागीय आयुक्तांनीही सर्वांना आदेश काढले. बीड पालिकेने २३ आॅक्टोबर २०१७ पासून प्लास्टिकविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. यासाठी सहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियूक्त केले. ३ हजार ६०६ दुकानांची आतापर्यंत तपासणी केली असून ७७ लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दोघांविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हाही दाखल केलेला आहे.दरम्यान, पालिकेच्या माहितीनुसार बीड शहरात प्रति दिन ३१ मे. टन कचरा निघतो. यात दीड टन प्लास्टीकचा समावेश असतो. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून प्लास्टिक बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांमध्ये प्लास्टिक येथे कोठून? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून बीड शहरात प्लास्टिक बंदी केवळ कागदावर असल्याचे दिसून येत आहे. सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे, हे वारंवार समोरही आलेले आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेने कडक पाऊले उचलण्याची मागणी आहे.हमिपत्र दिल्यानंतरही वापरसाधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी बैठक घेत दुकानदार, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, संस्था आदींकडून प्लास्टिक वापरणार नाही, असे हमीपत्र घेतले होते. किती लोकांनी हे हमिपत्र दिले? याची नोंदही पालिकेकडे नाही. यावरून पालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर येतो. माहितीनुसार जे दुकानदार व शासकीय कार्यालयांनी हमिपत्र दिले आहे, ते सुद्धा सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे सांगण्यात आले.बीड पालिकेतही वापरइतरांवर कारवाई करणा-या बीड पालिकेतही प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे समोर अलेले आहे. सध्याही अशीच परिस्थिती आहे. ‘लोकासांग ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ अशी परिस्थिती पालिकेची असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बंदी केवळ कागदावरच; बीडमध्ये दररोज दीड टन प्लास्टिक उत्पत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:04 PM