परळी : येथील सराफ व्यापारी अमर वसंतराव देशमुख व गोविंद देशमुख यांच्यावर सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद होती.
सोमवारी ( दि. १७ ) जागेच्या आर्थिक व्यवहारातून सराफा व्यापारी अमर देशमुख व गोविंद देशमुख या भावांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते गणेश दिलीप कराड व अन्य पाच जणांनी हल्ला केला. त्यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेने केली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश कराड यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मंगळवारी सकाळपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. मात्र, आरोपींना 48 तासाच्या आत अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिले आहे. तसेच १२ वीच्या परीक्षा सुरु असल्याने दुपारी 12 नंतर बंद मागे घेण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे देवराव लुगडे यांनी दिली आहे.