बीड/केज : उद्योग आणि साखर कारखान्यांसाठी घेतलेले कर्ज थकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसुली मोहीम सुरू केली आहे. बुधवारी बँकेच्या पथकाने केज येथे अंबा साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते रमेश आडसकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे तसेच अन्य थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजवून थकबाकी भरण्याचा हट्ट धरला. थकबाकीचा आकडा २९ कोटी १९ लाख रुपयांचा घरात आहे. वसुली पथकाच्या या गांधीगिरीची खुमासदार चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील राजकीय पुढारी पदाधिकारी असलेल्या विविध संस्था, उद्योग, कारखान्यांकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे बीड जिल्हा सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने बीड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा जिल्ह्याधिकारी अविनाश पाठक यांनी संबंधित थकबाकीदार संस्थांना स्मरण करून वसुली करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार ३ जुलै रोजी बीड जिल्हा बँकेचे पथक अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते रमेश आडसकर तसेच माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्या वकीलवाडी परिसरातील निवासस्थानाच्या दारात तसेच महसूल कर्मचारी पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या दारात डफडे वाजवून कर्ज भरणा करण्यासाठी जागे केले.
या पथकात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक ॲड. शरद ठोंबरे, उपव्यवस्थापक डी. व्ही. कुलकर्णी, उपव्यवस्थापक एस. बी. थोरात आणि सहायक व्यवस्थापक एन. एम. रामटेके यांच्यासह कर्मचारी हजर होते.
सरकार असताना वाजले डफडे!देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही भाजपच्याच नेत्यांच्या दारात डफडे वाजविल्याची चर्चा केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात होत आहे.
कोणत्या संस्थांकडे किती थकबाकी१) विक्रम मुंडे यांच्याशी संबंधित केज तालुक्यातील देवगाव येथील रेणुकामाता तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेकडे १ कोटी २६ लाख ७० हजार रुपये तर धारूर येथील राजीव गांधी जिनिंग प्रेसिंग संस्थेकडे ३६ लाख रुपये कर्ज थकीत आहे.
२) रमेश आडसकर चेअरमन असलेल्या अंबा साखर कारखान्याकडे १३ कोटी ७ लाख व १४ कोटी ३६ लाख रुपये थकीत आहेत. तर केज येथील महसूल कर्मचारी सहकारी संस्थेकडे ४६ लाख रुपये थकबाकी आहे.
१२ जुलैचा वादाअंबा कारखान्याला शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. हा निधी मिळताच कारखान्याकडील २७ कोटी ४२ लाखांची थकबाकी १२ जुलैपर्यंत भरण्याचे आश्वासन आडसकर यांच्याकडून देण्यात आले. तर लवकरात लवकर थकबाकीचा भरणा करण्याची हमी विक्रम मुंडे यांच्याकडून देण्यात आल्याचे वसुली पथकातील ॲड. शरद ठोंबरे यांनी सांगितले.