अत्यावश्यक सेवा सोडता पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने सर्वकाही बंद आहे. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बैलजोडी, बी-बियाणे, खत खरेदी करावे लागते; परंतु सध्या बँकाही बंद असल्याने शेतकऱ्यांना उसाचे बिल जमा करता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे, तर कित्येक शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा आहेत. शेतकरी बँकेत त्यांच्या हक्काचे पैसे घेण्यासाठी गेले असता काही बँकांना कुलूप दिसून येत आहे, तर काही बँकेत कर्मचारी सांगतात की सध्या बँकेतील अत्यावश्यक काम सोडता आम्ही इतर कामे करू शकत नाहीत, तसे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे बँकेत असताना त्यांना मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस, बाजरी, भईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका, सूर्यफूल या पिकांची लागवड करतात. त्यामुळे बँका पूर्णवेळ सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यास सुविधा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.