आष्टी : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत जमावबंदी व कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील आष्टा हरिनारायण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत निर्बंधाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. बँक ऑफ इंडिया या बँकेच्या प्रबंधकांनी नागरिक जमा होणार नाही, याकरिता कुठलीही उपाययोजना न केल्याने एकाच ठिकाणी नागरिकांचा घोळका बँकेसमोर जमा होत. जमावबंदी आदेशाचे पालन न करता कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास राज्यात लावलेल्या कडक निर्बंधाचे उल्लंघन केले जात आहे. मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टन्सिंगचीही पायमल्ली होताना दिसत आहे.
आष्टी तालुक्यामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. रूग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे जात आहे. कोणत्याच हाॅस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर जमिनीवर उपचार केले जात आहेत. तरीही जमावबंदी व कडक निर्बंधांचे सर्रास उल्लंघन होत आहे. नागरिक मनाला वाटेल त्याप्रमाणे ये-जा करताना आढळून येत आहेत. बँकेतही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. आष्टा येथील बँकेत १२ एप्रिल रोजी एकापाठोपाठ घोळका करुन उभे होते. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले,बँकांनी कोरोना नियमांचे काळजी घेण्यास ग्राहकांना सुचविले की नाही, अशी चर्चा लोक करत होते. बँकेच्या प्रबंधकांनी नागरिक एकाच ठिकाणी जमा होणार नाहीत. याकरता कुठलीच उपाययोजना केली नव्हती. शासनस्तरावर जमावबंदी होणार नाही यासाठी कडक निर्देश असताना देखील बँकेसमोर ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे याच बँकेतील कर्मचारी यापूर्वी पाॅझिटिव्ह आले होते. अशीच गर्दी राहिल्यास पुढे धोका निर्माण होऊ शकतो वेळीच खबरदारी न घेतल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
===Photopath===
130421\img-20210413-wa0633_14.jpg