: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या वेळकाढू धोरणांमुळे वृद्धांना नाहक त्रास होत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर झालेल्या नवीन लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमध्ये खाते काढण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. बँक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे निराधारांचे नवीन खाते उघडण्याचे काम रखडले आहे.
संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेतून केंद्र व राज्य सरकार, शेतकरी, भूमिहिन, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तिंना महिन्याकाठी १००० रुपये पगार दिला जातो. अशा लाभार्थींची संख्या अंबाजोगाई तालुक्यात तब्बल २३ हजार १७७ आहे. दर महिन्याला १ कोटी ४० लाख रुपये विविध बँकेत जमा होतात. बँकांच्या चकरा मारून वृद्ध थकतात. परंतु पगार हाती मिळत नाही.
ज्या नवीन लाभार्थींना या विविध योजनांचा लाभ उपलब्ध झाला, अशा लाभार्थ्यांना नवीन खाते काढण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका या नवीन खातेदारांना टोलवाटोलवी करत असल्याने अजूनही त्यांचे खाते निघालेले नाही. याचा मोठा फटका निराधारांना नीमूटपणे सहन करावा लागत आहे. बँकांनी आपल्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी. शहरात व ग्रामीण भागात अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्रीयीकृत व इतर बँका सामान्यांना नाहक त्रास देतात, अशी चर्चा खातेदारांमध्ये आहे. उर्मट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून उचित कारवाई करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.
--------
लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक बँकेला निराधारांचे नवीन खाते उघडण्याबाबत कळविले जाईल. ज्या बँका उदासीनता दर्शवतील, अशा बँकांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येईल.
विपिन पाटील,
तहसीलदार, अंबाजोगाई.
--------
महिन्याकाठी ज्यांचे जगणे पगाराच्या भरवशावर आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हाताने काम होत नाही. सरकारकडून मिळणारा आधार तोही बँकांच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कित्येक वृद्ध निराशेच्या खाईत ढकलले जात आहेत.
-----------