बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनरमुक्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी चौकातील बॅनर हटविण्यात आले. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या बॅनरचा समावेश हाेता. त्यामुळे या कारवाईचे बुधवारी स्वागत केले. परंतू गुरूवारी याच चौकात काही बॅनर जैसे थे असल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर जालना रोडवरील दुभाजकातही बॅनर कायम होते. पोलिस आणि नगर पालिकेने कारवाईत दुजाभाव केल्याने सामान्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
बीड शहरात सध्या गल्ली बाेळात बॅनर लागले आहेत. यामुळे शहर विद्रूप होत आहे. शिवाय वाहतूकीसह अडथळा होत आहे. अपघातासही निमंत्रण मिळत आहे. याच्या तक्रारी प्राप्त होताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुढाकार घेत नगर पालिकेच्या मदतीने हे बॅनर हटविण्याची मोहिम हाती घेतली. सुरूवातील सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनर बुधवारी दुपारी हटविण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह शिवाजीनगर, बीड शहर व वाहतूक शाखा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतला होता. त्यामुळे या कारवाईचे बीडकरांनी स्वागत केले.
दरम्यान, ही कारवाई करताना पोलिस आणि नगर पालिकेने दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे. आजही जालना रोड, नगर रोडवरील दुभाजकांमध्ये सर्रास बॅनर लागलेले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, आण्णाभाऊ साठे चौकातही बॅनर लागले आहेत. बुधवारी कारवाईचे स्वागत झाल्यानंतर गुरूवारची ही परिस्थिती पाहून बीडकरांनी पुन्हा रोष व्यक्त केला. कारवाई करताना दुजाभाव नको, शहर सुशोभिकरणासाठी प्रशासनाने सरसकट कारवाई करावी, शिवाय लोकप्रतिनिधी, सुजान नागरिकांनीही याला सहकार्य करण्याची गरज असल्याच्या भावना सामान्यांच्या आहेत.
काय म्हणतात मुख्याधिकारी....बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे चौकातील बॅनर हटविण्याची कारवाई सुरू होती. याचवेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेने बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतली. ते सोडून इतर बॅनर हटविले आहेत, असे बीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सांगितले. बीड शहरात ३८ ठिकाणी अधिकृत परवानगी लावण्याचे ठिकाण असल्याचेही त्या म्हणाल्या.
पोलिस काय म्हणतात...आम्ही सरसकट कारवाई केली आहे. आमचा बंदोबस्तही होता. जे बॅनर राहिले आहेत, त्यांना परवानगी असल्याचे पालिकेच्या पथकाने सांगितले. याबाबत तक्रारी येत असल्याने याचीही पालिकेकडून खात्री केली जाईल. बॅनर हटविताना दुजाभाव होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले.