बीड : ओडीसा राज्यातून गांजा आणत तो अंबाजोगाई, बीडमार्गे जालन्याला नेला जातो. गुरुवारी रात्रीही एक व्हीआयपी कार जालन्याला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांनी सापळा लावून चौघांना बेड्या ठोकल्या तसेच ९ लाख ६२ हजार रूपयांचा गांजा आणि कार जप्त केली. या प्रकरणाची दिंद्रूड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दत्ता वाघप्रसाद पवार (वय २५), विजय सुनील पवार (२१), कैलास गणेश पवार (२९, तिघेही रा. जालना) व कैलास अनिल गडगुळ (२०, रा.शिवाजीनगर, अंबड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही रेल्वेने ओडिसा राज्यातून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आले होते. त्यांच्यासोबत ६० किलो गांजा होता. त्यांनी जालन्याहून व्हीआयपी कार घाटनांदूरला बोलावून घेतली. रेल्वेतून उतरून हे चौघेही केज, धारूर, तेलगावमार्गे जालन्याला जात होते. त्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तेलगावजवळील नित्रूड गावाजवळ सापळा लावला. कार थांबवून तपासणी केली असता ६० किलो गांजा आढळला.
पाेलिसांनी तो जप्त करत दिंद्रूड पोलिसांच्या स्वाधीन केले. ९ लाख ६२ हजार रुपयांचा गांजा आणि कार असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, सुनील राठोड, मारोती कांबळे, रामदास तांदळे, राजू पठाण, विकी सुरवसे, नारायण कोरडे, अशोक कदम, नामदेव उगले आदींनी केली.