बीड : ढोल-ताशांचा दणदणाट... डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई... आकर्षक रोषणाईसह बाप्पांची विसर्जन मिरवणूक हे दरवर्षीचे चित्र. मात्र, कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव निर्बंधात साजरा करावा लागल्याने भाविकांचा काहीसा हिरमोड झाला, पण... बाप्पा मोरया रे... चरणी ठेवितो माथा... अशा भावनेसह भाविकांनी 'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालून लाडक्या गणरायाला निरोप दिला.
गणेशोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. गतवर्षी देखील कोरोनाच्या सावटाखाली हा उत्सव साजरा करावा लागला. यंदा दुसरी लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल होते, पण गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने स्वतंत्र नियमावली जारी केली होती. यंदा मंडपात जाऊन मूर्ती दर्शनाची मुभा नव्हती, सोबतच मुखदर्शनालाही परवानगी नाकारली होती. त्यामुळे सार्वजनिक मंडळांची संख्याही कमी होती. मात्र, घरोघरी 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दहा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मंडळ पदाधिकाऱ्यांनी साध्या पध्दतीने मूर्तीची पूजाअर्चा केली व निरोप दिला. यावेळी गुलालाची उधळण करत बाप्पांचा जयघोष करत मूर्ती विसर्जन करण्यात आले. बच्चेकंपनीमध्ये मोठा उत्साह होता. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
....
कंकालेश्वर, खंडेश्वरी, बिंदुसरावर गर्दी
नगरपालिकेने मूर्ती विसर्जन करण्यासाठी कंकालेश्वर मंदिराजवळ विहिरीचा परिसर स्वच्छ केला होता. शिवाय खंडेश्वरीदेवी मंदिराजवळही सोय केली हाेती. दोन्ही ठिकाणांसह पाली येथील बिंदुसरा धरणात मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची रेलचेल होती. सार्वजनिक मंडळांसह घरगुती मूर्ती विसर्जनासाठी भाविक चारचाकी तसेच दुचाकी वाहनांवरून येत होते. विसर्जन स्थळाच्या रस्त्यांची डागडुजी केली होती.
....