- संजय खाकरेपरळी (बीड): हर हर महादेव, बोल बोल बम भोले, बोल कावडिया बम बोलचा नारा देत नांदेड ते परळी अशी १२० किमी पायी कावड यात्रा काढून उत्तर प्रदेश येथील बरेलीतून आलेल्या भाविकांनी श्री वैद्यनाथ प्रभूस जलाभिषेक केला. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी कामिका एकादशी निमित्त आज ( दि. ३१ ) शिवभक्तांची सकाळपासून रीघ लागली. हजारो भक्तांनी श्री वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच येथील श्री संत जगमित्र नागा मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वैद्यनाथ मंदिर परिसर एकादशीच्या दिवशी गजबजून गेल्याचे चित्र होते.
बुधवारी सकाळी ११ वाजता उत्तरप्रदेश राज्यातील बरेली येथील महाकाल कावड सेवासंघाच्या १०० सदस्यांनी नांदेड येथील गोदावरीचे जल पायी कावड यात्राद्वारे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला वाहिले. तसेच भोग प्रसाद दाखवून वस्त्र अर्पण केले. नांदेड येथून कावड यात्रा २६ जुलै रोजी काढण्यात आली. ही कावड यात्रा ३० जुलै रोजी रात्री परळीत पोहचली, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख येथील माजी नगरसेवक राजेंद्र सोनी ,रमेश चोंडे व इतरांनी या यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर आज सकाळी कावड यात्रेतील १०० भाविकांनी हरहर महादेव, बोल बोल बम बम भोले, बोल कावडिया बम भोले, असा जयघोष करीत भक्तांनी दर्शन घेतले.
नांदेड ते परळी काढली कावड यात्राबरेली (उत्तर प्रदेश ) येथून आम्ही १०० भाविक आधी नांदेड येथे आलो. त्यानंतर नांदेड येथून कावडमध्ये गोदावरीचे पाणी घेत परळीपर्यंत कावड यात्रा काढली. आज सकाळी श्री वैद्यनाथास जलाभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. - विनोद गुप्ता, बरेली येथील भाविक