बीड : देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे उलटली तरी पाटोदा तालुक्यातील गीतेवाडीला जाण्यासाठी रस्ता काही झाला नाही. अनेकवेळा मागणी केली निवेदने दिली. तरीही पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने संतापलेल्या ग्रास्थांनी बुधवारी याच रस्त्यावरील खड्ड्यात आंघोळ केली तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले.पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ही गावे पाटोदा नगरपंचायतअंतर्गंत येतात. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. आठ दिवसांपूर्वी आपल्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून नगरपंचयातच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते चांगदेव गिते यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यातील चिखलात बसून आंघोळ करत अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच इतर ठिकाणी ग्रामस्थांनी खड्ड्यात गाडून घेऊन आंदोलन केले. याप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी चिखलात आंघोळ, स्वत:ला घेतले गाडून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 1:36 AM