माजलगाव (बीड ) : जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कार्यक्रमात चांगलाच गोधळ पाहायला मिळाला.
शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची माहिती व्हावी या हेतुने तालुका स्तरावर शिक्षणाची वारी हा एकदिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आज जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात 25 शाळामधील उपक्रमांचे प्रदर्शन होते. तसेच यासाठी तालुक्यातील सर्व शाळांच्या शालेय समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दुपारी कार्यक्रमाचे उदघाटन गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी बी.के. नांदुरकर, जयदत्त नरवडे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नरवडे यांचे भाषण सुरु असतांना अचानक देवखेडा येथील अरुणा श्रीरंग वाघमारे या स्टेजजवळ आल्या. काही कळायच्या आत त्यांनी गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यासमोर जात, 'मी पैसे देऊनही तुम्ही माझे रमाई घरकुल योजनेतुन घर मंजूर का केले नाही, तुम्हाला आणखी १० हजार कसे देऊ.' असा जाब विचारत गोंधळ घातला. चव्हाण यांनी याकडे दुर्लक्ष करताच वाघमारे यांनी संतप्त होत त्यांच्यावर टेबलवरील हार भिरकावला. यानंतर काही शिक्षिकांनी व नरवडे यांनी स्टेजकडे धाव घेत वाघमारे यांना समजावत बाजूला घेत शांत केले. झालेल्या प्रकारामुळे कार्यक्रमाचा पुरता बट्ट्याबोळ झाला. प्रदर्शनासाठी आलेली विद्यार्थीही यामुळे चांगलीच घाबरून गेली.
पैस्यांची केली मागणी अरुणा वाघमारे म्हणाल्या कि, गटविकास अधिकारी चव्हाण यांना घरकुल मंजुरीसाठी सुरुवातीला साडेचार हजार रुपये दिले त्यानंतर पुन्हा दीड हजार रुपये दिले.यावरही त्यांनी आणखी दहा हजार रुपयाची मागणी केली. यासाठी मी असमर्थता दर्शवतात त्यांनी मला आधी मोदीच्या खात्यात पैसे भरावे लागतात मगच तुमचे काम होईल असे म्हटले यामुळे मी संतप्त झाल्याची प्रतिक्रिया दिली.
शिक्षकात झाली फिल्मीस्टाईल हाणामारीयाच वेळी दारु प्यायला पैसे का दिले नाही म्हणुन दोन शिक्षकांमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारी व शिवीगाळीचा प्रकार भर कार्यक्रमात तब्बल 2 हजार लोकांसमोर झाला.
कागदपत्रे दिली नाहीत सदर महिलेने ग्रामसभेचा ठराव इतर कागदपत्रे कार्यालयाला दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना घरकुल देण्याचा प्रश्नच नाही. घरकुल कोणाला द्यायचे हा सर्व अधिकार ग्रामसभेला आहे. - बी. टी. चव्हाण, गटविकास अधिकारी
माहिती घेत आहे शिक्षकांमध्ये झालेल्या भांडणाची मला माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन संबंधीत शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. - बी.के.नांदुरकर, गटशिक्षणाधिकारी