लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मकरसंक्रांत झाल्याने महिला एकमेकींना वाण देण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे. परंतु, हे वाण देताना कोरोना तर पसरत नाही ना, असा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वांनी वाण देताना काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना नियमांचे पालन करून सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी १६ हजार ५५२ कोरोनामुक्त झाले असून ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील नव्या बाधित रूग्णांची संख्या कमी होत असली, तरी मृत्युदर कमी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.
मकरसंक्रांंतीनिमित्त महिला एकमेकींच्या घरी जाऊन वाण देताना दिसत आहेत. यासाठी अनेकांनी सार्वजनिक हळदीकुंकवाचा कार्यक्रमही ठेवला जात आहे. यावेळी गर्दी होत आहे. महिला नियमांचे पालन करीत नसल्याने धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत, सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
कोरोना पसरतोय...
पॉझिटिव्हमृत्यू
१४ जानेवारी १७ ००
१५ जानेवारी ३५ ०३
१६ जानेवारी ३७ ०१
१७ जानेवारी ३१ ००
१८ जानेवारी ३१ ००