बीड : शहरात रस्त्यावर तुमच्याशी कोणी विनाकारण वाद घालत असेल किंवा इतरांच्या भांडणात तुम्ही मध्यस्थी करायला जात असाल तर सावधान. संबंधितांचा तुम्हाला लुटण्याचाही 'प्लॅन' असू शकतो. तेव्हा नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
चोऱ्या, लूटमार करण्यासाठी गुन्हेगार नाना क्लुप्त्या करत असतात. आपले इप्सित साध्य करण्यासाठी गुन्हेगार आपसात भांडणाचा बनाव करु शकतात. काहीवेळा ते मुद्दाम तुमच्या वाहनासमोर आडवे येतात. धक्का लागल्याचे नाटक करतात अन् नंतर तुमच्याकडून दाबदडप करुन पैसे उकळतात. विशेष म्हणजे अशावेळी थेट हाणामारीपर्यंतही त्यांची मजल जाते. नंतर मिटवामिटवी करण्यासाठी थेट पैशांची मागणी होते. वाद घालण्यासह प्रकरण मिटविण्यापर्यंत गुन्हेगारांची साखळी असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे काही घडल्यास तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी.
....
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच लूट
चार महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरुन पायी जाणाऱ्या केज तालुक्यातील एका शेतकऱ्यास आपण पोलीस असून, पुढे तपासणी सुरु आहे... तुमच्याकडील सर्व वस्तू इथेच काढून द्या... असे सांगून हजारो रुपयांना लुटल्याचा प्रकार घडला होता. सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाला, पण अद्याप त्यास अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
...
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
१) गेवराई येथे सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तिला गाडीचा कट का मारला, या कारणावरुन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मारहाण केली. त्यानंतर त्यास धमकावत रोकड लंपास केली. ही व्यक्ती बाहेरगावी असल्याने ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे धाडसही केले नाही.
२) बीड बसस्थानकाच्या मागे काही लहानगे रस्त्यावर खेळतात. अनेकदा ते वाहनांना आडवे धावतात. त्यातून वाहनचालकाने त्यांना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्यावर नातेवाईक भांडण्यासाठी येतात. प्रकरण मिटविण्यासाठी नंतर पैशांची मागणी केली जाते.
....
काय काळजी घ्याल ?
रस्त्यावर धक्का लागला, कट का मारला, असे कारण काढून कोणी विनाकारण वाद वाढवित असेल तर तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवावे. शहरात वाहतूक पोलिसांचीही अशावेळी मदत घेता येऊ शकते. असा प्रसंग ओढवल्यास संबंधितांचे वर्णन व वाहनांचा क्रमांक लक्षात ठेवला पाहिजे, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.