बीड : हेल्मेट असतानाही केवळ कंटाळा करीत ते दुचाकीला पाठिमागे लटकवले. बीड-गेवराई मार्गावर बीड तालुक्यातील पारगावजवळ या तरूणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यात तो दुर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर मार लागला. परिसरातील लोकांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. सध्या या तरूणावर औरंगाबादमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी हे ज्वलंत उदाहरण निर्माण झाले आहे.
आण्णासाहेब राजेंद्र बारहाते (३० रा.बारहातेवाडी ता.कळंब) असे जखमी तरूणाचे नाव आहे. आण्णासाहेब हे औरंगाबादमध्ये उच्च न्यायायालयात वकील आहेत. मंगळवारी ते आपल्या गावी दुचाकीवरून (एमएच २० बीएस ६५२४) निघाले होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळील हेल्मेट डोक्याला न घालता पाठिमागे लटकवले.
पारगावजवळ येताच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. मोठा रक्तस्त्रावही झाला. इतर लोकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जास्त मार असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांना तातडीने औरंगाबादला हलविले. सध्या आण्णासाहेब हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. नागरिकांनी हेल्मेट वापरावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केले आहे.
... तर डोक्याला मार लागला नसताऔरंगाबादहून निघताच प्रवासादरम्यान आण्णासाहेब यांनी हेल्मेट डोक्याला लावणे गरजेचे होते. मात्र केवळ कंटाळा म्हणून त्यांनी ते पाठीमागे लटकवले. दुर्दैवाने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. यामध्ये ते बेशुद्ध झाले. जर डोक्याला हेल्मेट असते तर त्यांच्या डोक्याला मार लागला नसता, असे सांगण्यात आले.