लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुक्रवारी मध्यरात्री पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र पाऊस सुरू होताच बीड शहरातील वीज गायब झाली. पहाटेपर्यंत वीज न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मान्सूनपूर्व कामे न झाल्याने पहिल्याच पावसात महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागला. विशेष म्हणजे हा प्रकार नेहमीच होत असतानाही कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. महावितरणने पाऊस पडण्यापूर्वी लोंबकाळलेल्या तारा ताणने, वाकलेले खांब सरळ करणे, तारावर आलेले झाडांचे फाटे तोडणे यासाह इतर कामे करणे आवश्यक होती. मात्र काही ठिकाणीच हे कामे करण्यात आली. ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणीही थातुरमातूर कामे केल्याचा आरोप आहे. यामुळेच पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला. शुक्रवारी थोडावेळच पाऊस झाला तर संपूर्ण बीड शहर अंधारात राहिले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हणे, पहिला पाऊस असल्याने अडचणबीड शहरातील खंडीत वीजपुरठ्याबद्दल अधीक्षक अभियंता संजय सरग यांना संपर्क केला असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारा, असे सांगून हात झटकले. अधिकाऱ्यांच्या अशा टोलवाटोलवीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.याबाबत कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील म्हणाले, पहिला पाऊस असल्याने वीज खंडीत झाली असेल. पहिले एक दोन पावसात अशी अडचण होतच असते. नंतर होणार नाही. वीज पुरवठा खंडीत होऊ नये, ग्राहकांच्या तक्रारी येऊ नयेत, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात सर्व अभियंत्यांची सोमवारी बैठक बोलावल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.