ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 15 - ज्वारीसह हरभरा, गहू काढणीला आलेला असतानाच बुधवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गेवराई, बीड, अंबाजोगाई, गेवराई येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी, केज तालुक्यात वीज पडून प्रत्येकी दोघांचे बळी गेले, तर केज - आष्टी तालुक्यातही दोघांना प्राण गमवावे लागले.
जिल्ह्यात सकाळपासूनच वातावरणात उखाडा जाणवत होता. दुपारी आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर पावसाने वादळी- वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. परळी तालुक्यातील कौठळी येथे शेतात काम करणा-या मजुरांच्या अंगावर दुपारी चार वाजता वीज पडली. यात आश्रुबा किशन गायकवाड (६२), सुशीला कुंभार (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तहसीलदार विद्याचरण कडवकर, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण चाटे यांनी कौठळीत धाव घेतली. करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकामी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. हिवरा गोवर्धन येथे घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली. संसारोपयोगी साहित्य उडून गेल्याने ते शोधण्यासाठी ग्रामस्थांची धांदल उडाली. गारांसह पाऊस झाल्याने ज्वारी, गहू, कांद्याचे आतोनात नुकसान झाल्याचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी सांगितले. नागापूर येथेही नुकसान झाले. अर्जुनेश्वर देवस्थान परिसरातील चिंचेचे जुने झाड उन्मळून पडले. कावळ्याचीवाडी येथेही वीज कोसळली. भास्कर सलगर, शाहूराव पवार व शारदा शाहूराव पवार हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.