सतीश जोशीबीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा जिल्ह्यास पहावयास मिळाला. जि.प. आणि नगर पालिका निवडणुकीपासून बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुत्रे पुतण्या संदीपकडे देऊन जिल्ह्यातील नेते मंडळीनी पक्षांतर्गत चांगलीच कोंडी केल्याने आ.जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारच्या हल्लाबोल कार्यक्रमाकडेही पाठ फिरवली.
अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नबाब मलिक, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत तुळजापूरहून निघालेली राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा बुधवारी बीडमध्ये पोहोचली. तुळजापूरच्या कार्यक्रमास हजेरी लावलेले जयदत्त क्षीरसागर हे मात्र आपल्याच मतदारसंघातील बीडच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे मुंबईत या यात्रेच्या नियोजन बैठकीसही आ. क्षीरसागर उपस्थित होते; परंतु बीडच्या कार्यक्रमास त्यांची गैरहजेरी म्हणजे कौटुंबिक कलहाचा भाग असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने बीड येथे येऊन त्यांना बंगल्यावर चहापानास आमंत्रित केले. त्यांची ही चाल एक प्रकारे पक्षश्रेष्ठींना इशाराच होता; परंतु पक्षश्रेष्ठींनीही हल्लाबोल यात्रेचे बीडचे नियोजन पुतण्या संदीपकडे सोपवून आपला इरादा स्पष्ट केला. गेल्या सहा महिन्यांत बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत चार कार्यक्रम झाले. या चारही कार्यक्रमांना जयदत्त क्षीरसागर यांनी गैरहजेरी लावून आपली नाराजी व्यक्त केली होती.
पुतण्या जोरातएकीकडे काका जयदत्त नाराज होऊन राष्ट्रवादी पक्षापासून दूर जात असले तरी दुसरीकडे पुतण्या संदीप मात्र उत्साहाने पक्ष आणि संघटनवाढीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद आणि बीड नगरपालिका निवडणुकीत संदीप यांनी सरळ सरळ काकांविरुद्ध बंडखोरी केली होती. आताही आगामी बीड विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना सोबत घेत काम सुरू केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे बीडमध्ये राज्यस्तरावरील झालेल्या तीन ते चार कार्यक्रमांवर संदीप यांच्या संघटन कौशल्याची छाप दिसून आली. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. प्रकाश सोळंके या जिल्ह्यातील नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्याचे ‘कार्य’ चालू आहे.