अंबाजोगाई (जि. बीड) : कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दु:ख मराठवाडा वारंवार सहन करीत असतानाच आता परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान सहन न होऊन शेतकऱ्यांचा हृदयविकाराने अंत होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रकाश कारभारी चोरमले (४५) या शेतकऱ्याचा सोमवारी असाच मृत्यू झाला. रविवारी हिंगोली जिल्ह्यात अशीच घटना घडली होती.
पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
चोरमले यांना अडीच एकर शेती होती. पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब पावसाचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे. मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत हा शेतकरी मागील दोन दिवसांपासून होता. रात्री झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाहीत ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली. यावेळी चोरमले हे निपचित पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. प्रकाश यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. या प्रकरणी स्वाराती रुग्णालय परिसरातील पोलीस चौकीत नोंद झाली असून प्रकरण पुढील तपासासाठी बर्दापूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. व्हिसेरा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.- डॉ. विश्वजित पवार, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, स्वाराती, अंबाजोगाई