- नितीन कांबळेकडा : मुलाने विनाकारण दोन तीन वेळा मारहाण केल्याचा राग मनात धरून दारूच्या नशेत असलेल्या बापाने पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या मुलावर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील बाबासाहेब किसन खंडागळे हा मोलमजुरी करून राहतो. मुलगा राहुल खंडागळे वय 30 वर्ष याने तीन वेळा विनाकारण बापाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून सोमवारी पहाटे घरात मुलाबाळासह झोपलेल्या मुलावर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात मुलगा राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल केले पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.
आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सलिम पठाण, पोलीस नाईक संतोष नाईकवाडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब भगत, बंडू दुधाळ, वाहन चालक बांगर यांनी आरोपी बाबासाहेब किसन खंडागळे याला ताब्यात घेतले आहे.
ऐरवी झोपायला बाहेर पण तो झोपला घरीच
मुलाने दोन तीन वेळा मारहाण केली होती. तो राग मनात होता. ऐरवी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेडमध्ये झोपायला असलेला बाप मुलाला जिवे मारण्याचा चंग मनात बांधुन तो घरी झोपायला आला आणि पहाटेच्या सुमारास त्याने मुलावर कुर्हाडीने हल्ला केला.