बीड : कर्तव्यावर जाणाऱ्या डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. असे असले तरी जखमी डॉक्टरने अद्यापही तक्रार दिलेली नाही.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल वनवे हे बुधवारी रात्री बीडमधून आष्टीकडे कर्तव्य बजावण्यासाठी जात होते. याच दरम्यान त्यांना उपअधीक्षक संतोष वाळके व त्यांच्या पथकाने अडवून शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा येथे मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा आक्रमक झाली. तत्काळ निवेदन देत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. जोपर्यंत मारहाण करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. डॉक्टर संघटना आक्रमक झाली होती. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना निवेदन दिले. त्यानंतर गुरूवारी पहाटेपर्यंत दालनात चर्चा करण्यात आली. अखेर अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त करून दोन दिवसांत अहवाल प्राप्त होताच कारवाई करू, असे अश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टर संघटनेने आंदोलन मागे घेतले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आणि डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तक्रार देण्यास असमर्थता; आंदोलन मागे
डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी संघटनेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतू अवघ्या काही तासांत त्यांनी पुन्हा निवेदन देऊन आंदोलन मागे घेत असल्याचे कळविले. यात त्यांनी संबंधित डॉक्टर व त्यांच्या कुटूंबियांनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्याचे म्हटले आहे. परंतू यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याबाबत संबंधितांना सुचना कराव्यात अशी मागणीही होत आहे.
...
संबंधित जखमी डॉक्टरने आमच्याकडे लेखी दिलेले नाही. परंतू मारहाण करणे चुक आहे. याबाबत निवेदन दिले असून जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले आहे. सर्वत्र डॉक्टर कामावर हजर आहेत.
-डॉ.मिर्झा बेग, अध्यक्ष, मॅग्मो संघटना, बीड.
...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली डॉक्टरची भेट
पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या डॉ.वनवे यांची जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी भेट घेऊन चौकशी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
060521\06_2_bed_13_06052021_14.jpeg
===Caption===
जखमी डॉ.वनवे यांची जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी भेट घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आदी.