डॉ. शरद शिंदे यांचे आदर्श नगर भागात हॉस्पिटल आहे. त्यांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरु असताना कुरापत काढून २ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता संतोष बन्सी जाधव, अभिमन्यू दादाराव तिबोले, आशा बन्सी जाधव आणि विद्या तिबोले (चौघे रा. शिक्षक कॉलनी) यांनी डॉ. शिंदे यांना शिविगाळ करुन टिकावाच्या लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली होती. यात ते जखमी झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक सुनिल गोसावी यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. आर. एस. बोंद्रे यांच्या समोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. शरद शिंदे, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. धनंजय वाकणकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली त्यांना ज्येष्ठ विधिज्ञ शहाजी जगताप, विशाल मुरळीकर यांनी सहकार्य केले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद, समोर आलेले साक्ष, पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने संतोष बन्सी जाधव, अभिमन्यू दादाराव तिबोले, आशा बन्सी जाधव आणि विद्या तिबोले या चौघांना या प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना चार महिन्यांची कैद व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावल्याची माहिती सरकारी वकील ॲड. वाकणकर यांनी दिली.
------------