माजलगाव : ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नालीत पाण्याचा पाईप सोडल्याच्या कारणावरून एका शिक्षक आणि विद्युत कर्मचाऱ्याच्या कुटुंबात मारहाण झाली. ही घटना तालुक्यातील चिंचगव्हाण येथील आदर्श नगर येथे शुक्रवार संध्याकाळी घडली. दोन्ही गटातील सात जणाविरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरापासून जवळच असलेल्या चिंचगव्हाण येथील आदर्श नगर भागात शिक्षक सलीम बेग जागीर बेग राहतात. त्याच भागात शेजारी एमएसईबी गंगामसला कार्यालयात ऑपरेटरचे काम करणारे कैलास हनुमान उघडे राहतात. शुक्रवार संध्याकाळी सलीम बेग यांनी बांधकाम मिस्त्री इरफान खान हसन खान यांच्यामार्फत आपल्या घरातील सांडपाण्याचा पाईप ग्रामपंचायतीने बांधलेल्या नालीत सोडण्याचे काम चालू केले होते. परंतु सदरील नाली उघडे यांच्या तक्रारीनुसार आसपासच्या प्रत्येक कुटुंबानी पाच हजार रुपये देऊन बांधली होती. त्यात बेग यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे उघडे यांनी बेग यांचा सांडपाण्याचा पाईप नालीत सोडण्यास हरकत घेतली. यावेळी दोन्ही कुटुंबात वाद वाढून हाणामारी झाली.
दरम्यान सलीम बेग जहागीर बेग यांच्या फिर्यादीनुसार हनुमान उघडे, कैलास उघडे, आकाश उघडे व विकास उघडे या चौघांनी बेग यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी अफशा बेग यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी आयशा बेग यांच्या गळ्यातील नेकलेस हरवले आहे. तर कैलास हनुमान उघडे यांच्या फिर्यादीनुसार सलीम बेग अपशा बेग व बांधकाम मिस्तरी इरफान खान हसन खान या तिघांनी उघडे यांच्या घरात घुसून त्यांच्या आई आणि त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा तपास पोउपनि भाटकर हे करत आहेत.