बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत आहेत. दोन दिवसांपासून एका एका बेडसाठी रुग्ण व नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. सोमवारी रात्री तर एकही बेड रिकामा नव्हता. त्यामुळे सहा नंतर आलेल्या रुग्णांना बेड देता का बेड, अशी म्हणण्याची वेळ आली होती. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात रोज कोरोना बाधितांचा आकडा दीड हजारीपार जात आहे. यात रोज २०० पेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेणे गरजेचे असते. परंतु तपासणी केल्यानंतरही रुग्णांना बेडच मिळत नाहीत. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. परंतु, ऑक्सिजनवाल्या रुग्णांना मात्र, बेड रिकामा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात सध्या जुन्या इमारतीत ४६० तर नर्सिंग हॉस्टेलमध्ये २६० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था केलेली आहे. परंतु या सर्व खाटांवर सोमवारी रात्री रुग्ण उपचार घेत होते. एकही बेड रिकामा नव्हता. एका बेडसाठी नातेवाईक व रुग्णांना धावपळ करावी लागत होती. काही लोकांना तर रात्री ११ पर्यंत बेड मिळाला नव्हता. बेड रिकामा होण्याची ते प्रतीक्षा करीत होते. प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रुग्णांना सुटी देण्यासाठी दोन डॉक्टर वॉर्डात
जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा भरल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डॉ. रेवडकर आणि डॉ. शंकर काशीद हे दोन डॉक्टर ऑक्सिजनची आवश्कता नसलेल्या रुग्णांना सीसीसीमध्ये पाठविण्यासाठी कोरोना वॉर्डमध्ये गेले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची तपासणी सुरूच होती.
मध्यरात्री २० खाटांची व्यवस्था
फिव्हर क्लिनिकमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्ण जमिनीवर झाेपले होते. ही संख्या वाढल्याने तत्काळ नर्सिंग हॉस्टेलमधील एका हॉलमध्ये २० खाटा तयार करण्यात आल्या. येथे ऑक्सिजन मशीनही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर हे ठाण मांडून होते. तर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सुखदेव राठोड हे संपर्कात होते. सोनाली कुलकर्णी, कॉलमन मुन्ना जगताप, परवेज पठाण, सतीष गायकवाड हे देखील येथे उपस्थित होते.
===Photopath===
040521\04_2_bed_12_04052021_14.jpeg
===Caption===
नर्सिंग हॉस्टेलमध्ये मध्यरात्री २० खाटा तयार करून ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली हाेती.