बीड : कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या आता डोकेदुखी ठरत आहे. शुक्रवारी तर जिल्हा रुग्णालयात एकही खाट उपलब्ध होत नव्हती. इकडे खाट मिळत नसल्याने रुग्ण तडफडत होते तर दुसऱ्या बाजूला प्रशासन झोपेत होते. खाटा रिकाम्या करण्यासाठी गंभीर रुग्णांनाही रुग्णालयातून सुटी दिली जात होती. नियोजनात अपयशी ठरलेले प्रशासन आणि आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी होत नाही. रोज दहापेक्षा जास्त लोकांचा बळी जात आहे. हे सर्व राेखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. शुक्रवारी तर जिल्हा रुग्णालयात एकही बेड शिल्लक नव्हता. दुपारपासून रुग्ण आणि संशयित फिवर क्लिनिकच्या बाहेर रांगा लावून होते, परंतु त्यांना खाटा मिळत नव्हत्या. प्रशासनाकडून नवीन ३२० खाटांचे नियोजन केले जात असल्याचा नुसताच बोभाटा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, खाटा मिळत नसल्याने रुग्ण नियंत्रण कक्ष आणि अधिकाऱ्यांना संपर्क करत होते, परंतु एकही अधिकारी त्यांना प्रतिसाद देत नव्हता. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवून नियोजन केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात याचे काहीच नियोजन नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खाटा रिकाम्या करण्यासाठी रुग्णांना डिस्चार्ज
खाटा अपुऱ्या पडत असल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी फिजिशियन, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सपाटाच लावला होता. विशेष म्हणजे ज्या वृद्ध महिलेचा एचआरसीटी स्कोअर ८ होता, त्या महिलेला देखील सुटी देण्यात आली.
महिनाभरापासून नियोजन होत नाही का?
जिल्हा रुग्णालयातील खाटा पूर्ण होणार हा अंदाज आल्यानंतर नर्सिंग हाॅस्टेल, डोळ्यांचा कक्ष, नर्सिंग कॉलेज या इमारतींमध्ये खाटा वाढविण्याचे नियोजन मागील महिनाभरापासून केले जात आहे. परंतु अद्यापही या खाटा तयार झालेल्या नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पाहणी करुन केवळ सूचना केल्या. प्रत्यक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना खाटांचे नियोजन न झाल्यानेच आज रुग्णांना तडफडण्याची वेळ आली आहे. आता आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खाटांची माहिती घेत आहे. नियोजन केले जात आहे.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
===Photopath===
160421\16_2_bed_8_16042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर अशाप्रकारे शुक्रवारी गर्दी झाली होती.