लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : मधमाशी पालन सध्या काळाची गरज आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाला तर काही वर्षात मानवी जीवनसुद्धा धोक्यात येईल. त्यासाठी मधमाशी पालन हा एक शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जोपासला पहिजे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र प्रा. पुष्पक बोथीकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
कृषी विज्ञान केंद्र, खामगाव आयोजित शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण मंगळवारी पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पुष्पक बोथीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, मधमाशीपासून तयार होणाऱ्या पदार्थाचा मानवी जीवनात खूप मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे मधमाशीमुळे पिकामध्ये परागीकरण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येसुद्धा १५-२० टक्के वाढ होते. त्यानंतर रासायनिक कीटनाशकांचा अतिरिक्त वापर करणे टाळावे. कारण कीटकनाशकामुळे मधमाशांचा मोठ्या प्रमाणत ऱ्हास होत आहे.
कीटकशास्त्रज्ञ डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमान गरुड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. किशोर जगताप व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.