बीड : चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजुच्या रस्त्यावर केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
शंकर राठोड (रा.बीड) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयातून पेनड्राईव्ह चोरी झाला होता. यात एका वकिलाला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने कोठडीही दिली होती. याच प्रकरणात त्याचा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी राठोड यांनी संबंधिताकडे दहा हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने राठोड यांना लाच न देता थेट जालना गाठले आणि तेथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली. २ तारखेला तक्रार देताच टीम दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होती.
शनिवारी दुपारीच राठोड यांनी दहा हजार रूपये मागितले. ही लाच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजुला असणाऱ्या एका रूग्णालयासमोर घेण्याचे ठरले. तक्रारदाराकडून १० हजार रूपयांची रक्कम स्विकारताच एसीबीने झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. राठोड यांना रात्री उशिरा बीडच्या एसीबी कार्यालयात बसविण्यात आले होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
जालना टिमने केली कारवाईतक्रारदाराने बीडमध्ये तक्रार न देता जालना येथील कार्यालयात दिली. दोन दिवस वॉच ठेवल्यानंतर शनिवारी सायंकाळी राठोड त्यांच्या जाळ्यात अडकले. जालना कार्यालयातील टिम बीडच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तठ ठोकून होती.
आणखी एकाचा समावेश?शंकर राठोड यांच्यासह आणखी एक कर्मचारी यामध्ये आरोपी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये तो कर्मचारी दोषी आहे की नाही, याची खात्री जालना एसीबीकडून केली जात होती. याबाबत जालना येथील अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.