बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:40 IST2025-03-19T19:40:05+5:302025-03-19T19:40:37+5:30
वर्ष २०११-१२ मध्ये विमानतळाबाबत तत्त्वत: मंजुरी देऊन ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले होते. सध्या यासाठी ५० कोटींची तरतूद लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी
- शिरीष शिंदे
बीड : बीडच्याविमानतळास २०११-१२ मध्ये तत्त्वत: मंजुरी मिळाली होती, त्यावेळी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचे ठरले होते; मात्र त्यानंतर याबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. तब्बल १२ वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा केली. २०११-१२ मध्ये विमानतळ कामास ५० लाख रुपयांची तरतूद अपेक्षित होती; पंरतु आता ५० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. म्हणजेच भूसंपादन १०० पटींनी वाढले आहे.
बीड येथील ३० जानेवारी रोजी झालेल्या ‘डीपीसी’च्या बैठकीत पालकमंत्र्यांनी विमानतळाबाबत सकारत्मकता दाखवली होती. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने नवीन विमानतळ उभारणीसाठीचा प्रस्ताव मंत्रालयास सादर केला. एमएडी कंपनीचे महाव्यवस्थापक आर. पी. चाऊल यांनी नवीन विमानतळासाठी १३५ हेक्टर जागेची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार बीड तालुक्यातील शहाजानपूर (लिंबा) येथे एकूण १५३.५७ हेक्टर जमीन उपलब्ध असल्याचे नमूद केले. तसेच विमानतळासाठी एकूण प्रस्तावित क्षेत्र अंदाजित २५०० मीटर लांबी व १५०० मीटर रुंद असे १५३.५७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी शासकीय गायरान जमीन १० हेक्टर ६९ आर, तर उर्वरित १४२.८८ हेक्टर आर खासगी संपादित करावी लागणार आहे. खासगी भूसंपादनासाठी अंदाजित प्रतिहेक्टरी ६ लाख याप्रमाणे अंदाजित ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा विधिमंडळात सोमवारी केल्याने या कामास आता गती मिळणार आहे.
२०११-१२ मध्ये तत्त्वत: मंजुरी
सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी २०११ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी, गतिमानता वाढावी, यासाठी बीड येथे विमानतळ करण्याबाबत तत्त्वत: मंजुरी बैठकीत देण्यात आली होती. वर्ष २०११-१२ मध्ये विमानतळाबाबत तत्त्वत: मंजुरी देऊन ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले होते. सध्या यासाठी ५० कोटींची तरतूद लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
विजयसिंह पंडित यांच्या मागणीला यश
आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड येथे नवीन विमानतळ उभारणीची मागणी केली होती, त्यांच्या मागणीला यश आले. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीचा उल्लेख करून विधानसभेत बीड येथे नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून, जिल्ह्यातील उद्योगवाढीला मोठा फायदा होणार आहे.