बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपूर्वी बीड आणि अंबाजोगाई शहरात विद्युत शवदाहिनी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी कार्यारंभ आदेशही दिला. परंतु, ऐनवेळी निधी उपलब्ध न झाल्याने या दोन्ही शवदाहिन्यांचे काम रखडल्याचे समोर आले आहे. या कामाचे पुन्हा नव्याने कार्यारंभ आदेश काढण्यात येणार असून, लवकरच दोन्ही ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याचे काम सुरू होईल, असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्याच्या तुलनेत कोरोनाच्या पहिल्यात लाटेत नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटर येथील उपचार पद्धती आणि सुविधांची ख्याती सर्वदूर पसरल्याने बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे वाढला. साहजिकच येथे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले. परंतु भीतीमुळे कोरोनाच्या मृत रुग्णांवर पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू देण्यास प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अंबाजोगाई येथे तातडीने विद्युत शवदाहिनी उभारण्यात यावी, अशी मागणी अंबाजोगाई नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हा विकास निधीतून बीड आणि अंबाजोगाई येथील विद्युत शवदाहिनीसाठी प्रत्येकी ९२ लाख ५३ हजार ८५५ रुपयांची तरतूद केली. २१ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांनी कार्यारंभ आदेशदेखील दिले. दोन्ही नगरपालिकांनी सदरील काम आम्ही आमच्या स्तरावर निविदा प्रसिद्ध करून घेऊत, अशी विनंती केली होती. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या कामाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोपविली. या कामाचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला देण्यात आले. या प्रकल्पाचे बेस वर्क सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यानंतर उर्वरित संपूर्ण काम कंपनीने करावयाचे होते. नगरपालिकांकडे केवळ जागा उपलब्ध करून नंतर विद्युत मीटर देणे आणि वीज बिल भरणे ही कामे देण्यात आली. सुरुवातीचे तीन वर्षे देखभालीचे काम कंपनीकडे होते; तर त्यानंतर १५ वर्षांपर्यंत ‘मानवलोक’ ही संस्था सेवाभावातून प्रतिवर्षी एक लाख रुपये देखभाल खर्च कंपनीला देणार होती.
दरम्यान, विद्युत शवदाहिनीसाठी बीड नगर परिषदेने बिंदुसरा नदीपात्राजवळची, तर अंबाजोगाई नगर परिषदेने सर्व्हे क्र. १७ मधील जागा उपलब्ध करून दिली. अवघ्या १५ दिवसांत हे काम पूर्ण करावे असे आदेश होते. मात्र, ऐनवेळी निधीची उपलब्धता न झाल्याने हे दोन्ही प्रकल्प रखडले. अंबाजोगाईत कोरोना मृतांची संख्या अधिक असल्याने नगर पालिकेने वारंवार जिल्हा प्रशासनाकडे यासाठी पाठपुरवा केला, परंतु अद्यापही या कामाची सुरुवात झालेली नाही. परिणामी, अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेकडील संसाधने कमी पडत असल्याने सातत्याने गंभीर प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी विद्युत शवदाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
..
ऐनवेळी निधी उपलब्ध न झाल्याने बीड आणि अंबाजोगाई येथील विद्युत शवदाहिन्यांचे काम रखडले होते. सध्या या कामाचे नव्याने अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. नव्याने कार्यारंभ आदेश काढण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होईल.
- सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
...
विद्युत शवदाहिनीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. कार्यारंभ आदेशानंतर आम्ही शवदाहिनीसाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. निधी आम्हाला देऊन काम करण्याची परवानी द्यावी, यासाठी मागणी केलेली आहे.
-उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड.
....
अंबाजोगाईसाठी विद्युत शवदाहिनीची अत्यंत गरज आहे. आम्ही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. यासाठी मागील आठवड्यातही आम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली होती. नगर परिषदेने शवदाहिनीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने काम सुरू केले की ताबडतोब विद्युत जोडणी घेण्यात येईल. मृतांची वाढती संख्या पाहता सर्व्हे क्र. १७ मध्ये सध्या आणखी एक शेड उभा करण्यात येणार आहे.
- अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई.