- सोमनाथ खताळबीड - साईराम मल्टीस्टेटचा अध्यक्षासह संचालक मंडळाने वकिलाची ३० लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जूलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. साईराम मल्टीस्टेटविरोधातील गुन्ह्यांचे सत्र कायम असून पोलिसांकडून आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. बीड शहरातील आदर्श नगर भागातील ॲड. योगेश हनुमान गव्हाणे यांच्या फिर्यादीनुसार त्यांना अध्यक्षासह संचालकांनी जादा व्याजदराचे आमिष दाखविले. त्यामुळे त्यांनी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या शाहुनगर भागातील शाखेत मुदत ठेव ठेवली. आता त्याची मुदत पूर्ण होऊनही त्यांना एक रूपयाही परत केलेला नाही. वारंवार शाखेत खेटे मारूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने ॲड.गव्हाणे यांनी शिवाजीगनर पोलिस ठाणे गाठत २० जूलै रोजी फिर्याद दिली. त्यावरून अध्यक्ष शाहीनाथ विक्रमराव परभणे, साधना शाहीनाथ परभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक शाहिनाथ परभणे, शाखा व्यवस्थापक बनकर यांच्यासह इतरांविरोधात शिवाजीगन पोलिस ठण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्ह्यांचे सत्र सुरूच, पण आरोपी अटक नाही
साईराम मल्टीस्टेटविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र आजही कायम आहे. हजारो लोकांच्या ठेवी घेऊन शाहिनाथ परभणेसह संचालक मंडळ फरार झाले आहे. त्यांच्या अटकेसाठी ठेविदारांनी अनेकदा आंदोलनही केले. परंतू पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मुख्य आरोपी शाहीनाथसह संचालक, अधिकारी हे अजूनही फरारच आहेत. त्यामुळे पोलिसांविरोधात ठेविदारांमध्ये रोष आहे.