बीड : परळी, सोनपेठ येथून दुचाकी चोरून आणत त्यावर चुकीचा क्रमांक टाकून रूबाब गाजविणाऱ्या एका आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी सायंकाळी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सपोनि अमोल धस व त्यांच्या पथकाने केली.
अशिष हनुमंत भरडे (२१ रा.सिरसाळा, ता.परळी) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. आशिषचे सिरसाळा येथे वॉशिंग सेंटर आहे. दोन वर्षापूर्वी त्याने परळी नगर परिषद आणि सोनपेठ येथील तहसील कार्यालयातून दुचाकी चोरी केल्या. या दुचाकींवर चुकीचा क्रमांक टाकला शिवाय चेसी नंबरही खोडला. एक दुचाकी स्वता: वापराया तर दुसरी समोरच काम करणाऱ्या गॅरेजवाल्या मित्राला वापरायला दिली. हाच प्रकार पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना समजला. त्यांनी तात्काळ सपोनि अमोल धस यांना पाठवून आशिषच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. त्याला परळी शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, साजीद पठाण, सखाराम पवार, तुळशीराम जोगदंड, राजू वंजारे आदींनी केली.