माजलगाव (जि. बीड) : आर.जी. वैराळे मल्टिस्टेट पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीच्या कारणावरून थेट कर्जदाराचे बोट चावून तोडल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी कर्जदाराच्या फिर्यादीवरून गौतम वैराळे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी उशिरा परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
शहरातील अशोक नगर भागात राहणारे परमेश्वर बबन आडागळे यांनी २०१४ साली आर. जी. मल्टीस्टेट मधून ४१ हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जदाराने आतापर्यंत २४ टक्के व्याजदराने ६० हजार रुपयांची परतफेडही केली आहे. तरीही बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सतत वसुलीसाठी तगादा सुरू होता. १७ आॅगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान गौतम वैराळे यांनी कर्जदार परमेश्वर आडागळे यांना रात्री त्यांच्या घरी बोलावून घेतले होते. बँकेचे पैसे परत का करीत नाहीस असे म्हणून धमकावत शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. यावेळी वैराळे यांनी अडागळे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला जोराने चावा घेऊन ते तोडले. यामुळे परमेश्वर आडागळे यांनी रात्री शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गौतम वैराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैराळे यांनीही दाखल केली तक्राररात्री उशिरा गौतम वैराळे यांनीही परमेश्वर अडागळे यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने वरील प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करीत आहेत.