बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर भगवेमय झाले असून मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, व्याख्यान आदी कार्यक्रम सुरू आहेत.जयंतीनिमित्त शहरातून सर्वधर्मिय अभिवादन फेरी काढण्यात येणार आहे. तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणारी शोभायात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. यावेळी नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज, चाकरवाडीचे महादेव महाराज, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, ज्ञानयोग परिवाराचे माऊली महाराज दुसानी, नवगण राजुरीचे महंत अमृतदास जोशी आदी संत, महंतांची उपस्थित राहणार आहे.संपूर्ण भारतभर अत्यंत लोकप्रिय असलेले पंजाब, केरळ, ओरिसा, पश्चिम बंगाल येथील कलावंताचे डोळ्याचे पारणे फेडणारे कलाप्रकार शिवजयंतीचे मुख्य आकर्षण आहेत. तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक श्रीमंती दर्शवणारे कला प्रकार, कलावंतांचे झांजपथक, ढोल पथक इत्यादींच्या माध्यमातून बीडमधील आगळा वेगळा शिवजयंतीचा उत्सव शिवप्रेमींना पर्वणी ठरणार आहे.या शिवजयंती उत्सव सोहळ्यात सर्व नागरिकांनी, शिवप्रेमींनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन मार्गदर्शक आ.संदीप क्षीरसागर, उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय जाधव, उपाध्यक्ष अशफाक इनामदार यांनी केले आहे.वर्गणीमुक्त, डीजेमुक्त शिवजयंती म्हणून बीडचा मागील काही दिवसांपासून नामोल्लेख होतो. बुधवारी सकाळी ७ वा. शिवपूजन सोहळा होणार असून, यावेळी शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बीड शहर भगवेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:06 AM