अंबाजोगाई : नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई शहर स्तब्ध झाले आहे. शुक्रवारी (18 जानेवारी) रात्री ८ वाजता परळी वेस परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जोगदंड यांच्यावर भावकीतील सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावाचे अनैतिक संबंध नगरसेवक जोगदंड यांना भोवल्याचे तपासातून पुढे आले आहे.
याप्रकरणी विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे कि, दोन वर्षांपूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे भगवान दत्तू जोगदंड आणि त्याची मुले नितीनवर चिडून होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणाऱ्या कमानीजवळ थांबला असताना राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मान्य भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सहा सख्खे भाऊ तलवार, गुप्ती आणि कोयता घेऊन तिथे आले नितीनला शिवीगाळ करत मालूने नितीनवर गुप्तीने वार केला.
दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे माहित झाल्याने नगरसेवक विजय जोगदंड यांनी तिथे धाव घेतली आणि हल्लेखोरांची समजूत घालू लागले. त्याचवेळी राज याने तलवारीने आणि करण याने कोयत्याने विजय यांच्या डोक्यात, कानावर, गालावर आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात विजय जोगदंड गंभीर जखमी झाले. यावेळी नितीनने जीवाच्या भीतीने तिथून पळ काढला. विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीही घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर गल्ल्तील लोकांनी विजय जोगदंड यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते यांनी रुग्णालय आणि घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाहून जीवाच्या भीतीने पळालेला नितीन जखमी अवस्थेत मध्यरात्रीपर्यंत एका खदानीत लपून बसला होता. त्यानंतर काही व्यक्तींनी त्याला शोधून काढले आणि धीर देत पोलीस ठाण्यात घेऊन आले. रात्री उशिरा नितीन जोगदंड याच्या फिर्यादीवरून सहा आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, विजय जोगदंड यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच त्यांच्या शेकडो समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. विजय जोगदंड यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
▪ आरोपींच्या शोधासाठी पाच पथके; दोन आरोपी अटकेत :दरम्यान, घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. तातडीने पंचनामा करून घटनास्थळाहून हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली. रात्रीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
▪ नगरसेवक पदाची उल्लेखनीय कारकीर्द :दोन वर्षापूर्वी अतिशय सामान्य घरातील विजय जोगदंड हे स्वतःच्या जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. नगर पालिका सभागृहात स्वच्छतेच्या प्रश्नावर आणि प्रभागातील अडचणीसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला. काही प्रश्नांवर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या होत्या. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात देखील त्यांचा पुढाकार असे. एका उमद्या तरुण तडफदार नगरसेवकाच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
▪ “आतापर्यंत दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरु आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल. पाच पोलीस उपनिरीक्षकांची पाच पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली आहेत.” - सोमनाथ गीते, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर