माजलगाव ( बीड) : शहराजवळील परभणी रस्त्यावर असलेल्या नागडगाव फाट्यावरील गावरान धाब्यावर रविवारी राञी जेवनास आलेल्या युवकांमध्ये आपसातील भांडणे झाली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या धाबा चालक महादेव निवृत्ती गायकवाड(55), मुलगा आशितोष महादेव गायकवाड यांना युवकांनी जबर मारहाण केली. यात धाबाचालक महादेव गायकवाड यांचा राञी उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा आशितोष (25), स्वयंपाकी शेख बुढण हे दोघे गंभीर जखमी आहेत.
शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्ग-61पाथरी रोडवर नागडगाव फाटा येथे महादेव निवृत्ती गायकवाड ( रा.मंगलनाथ काॅलनी ) यांचे गावरान ढाबा हॉटेल आहे. या हॉटेलवर रविवारी रोहित शिवाजी थावरे व त्याच्या चार मित्रांनी सायंकाळी सहा वाजता मासे बनविण्यासाठी आणून दिले. जेवण केल्यानंतर 7 वाजता त्यांच्यात वादविवाद झाला. यातून त्यांनी धाब्यावर तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार निदर्शनास आल्याने आशितोष गायकवाड यांने त्या युवकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित शिवाजी थावरे याने काठीने आशितोष याच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. त्याचवेळी भांडण सोडविण्यास आलेल्या महादेव गायकवाड यांनाही या युवकांनी काठीने बेदम मारहाण केली. हे पाहून स्वयंपाकी बुढन हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
त्यानंतरही त्या युवकांनी धाब्यावर राडा माजवत गायकवाड पितापुत्रास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करत तेथुन पोबारा केला. या वेळी परीसरात असलेल्या लोकांनी वाहनात घालून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथम उपचार करून जखमी महादेव गायकवाड यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यास सांगितले. रात्री उशिरा उपचारादरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर तर मुलगा आशितोष, शेख बुडन तिच्यावर खाजगी रुग्णालयात दुसऱ्या दिवशीही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी आशितोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रोहित शिवाजी थावरे रा.आनंदगाव व इतर 5 जणांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात बाबासाहेब आगे यांचा निर्घृण खून भररस्त्यावर करण्यात आला होता. यामुळे गुंडांच्या दहशतीचे सावट शहरावर पसरलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्व आरोपींची नावे घ्यावीत, पोलिस ठाण्यासमोर ठिय्यायादीमध्ये सर्व आरोपीचे नावे घेण्यात यावी व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी महादेव गायकवाड यांचा मृतदेह दोन तास ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभूमी येथे गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.