- सतीश जोशी
बीड : दहा वर्षापूर्वी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली बीड डीसीसी बँक मागील पाच वर्षात संचालक मंडळ आणि बँक प्रशासनाच्या उत्कृष्ट आर्थिक नियोजनामुळे सक्षम झाली आहे. मागील पाच वर्षात गुंतवणुकीवर बँकेने ११६ कोटी ७३ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे तर बँकेवरील विविध कर्जांचा भरणा करु न बँक कर्जमुक्त झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
२०११ नंतर जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली होती. २०१५ मध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने उत्कृष्ट नियोजन करीत बँकेला आजपर्यंत आर्थिक सुस्थितीमध्ये आणले. ३१ मार्च २०११ ला मागील संचालक मंडळाच्या कालावधीत राखीव निधी २९२.२४ कोटी रूपये होता तर प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत ४६९ कोटी २१ लाख रूपये होता. विद्यमान संचालक मंडळाच्या कालावधीत ३१ मार्च २०२० अखेर हा निधी ६७९ कोटी रूपयांवर पोहचला आहे, असे सारडा यांनी सांगितले.
बँकेकडे सध्या १६९०.९८ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. बँकेच्या राखीव व इतर निधी तरतूदीमध्ये २०११ च्या तुलनेत मार्च २०२० अखेर ३८६.७६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बँकेने बुडीत आणि संशयित कर्जामध्ये बँकेला झालेल्या नफ्यातून तरतूद केल्याने या निधीमध्ये वाढ झाली आहे. बँकेच्या गुंतवणुकीमध्ये तसेच गुंतवणुकीवर मिळालेल्या नफ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे, असे आदित्य सारडा यांनी सांगितले.
विद्यमान संचालक मंडळाच्या कालावधीत २ लाख ९८ हजाराने ठेवीदार ग्राहकांची संख्या वाढली. यावरुन ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे ठेवी मिळत नाहीत अशा तक्रारींचे प्रमाणही नगण्य आहे.- आदित्य सारडा, अध्यक्ष, डीसीसी बँक