- सोमनाथ खताळबीड : ऊस तोडणीला जाणाऱ्या तब्बल १३ हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. या संबंधीचा अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे. सर्वेक्षणात सर्वच ८२ हजार ९०० ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणा-या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचे समोर आले होते. काही खासगी रुग्णालयांनी अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया केल्याचेही काही प्रकरणांत समोर आले. त्यानंतर, राज्य सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली.
या समितीने बीडमधील महिलांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिकांशी बोलून अडचणी व उपाययोजना जाणून घेतल्या होत्या. समितीने जिल्ह्यातील ऊसतोडणीला जाणाºया महिलांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर, आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन ऊसतोडणी महिलांची माहिती घेण्यात आली. कधी व कोठे गर्भपिशवी काढली, याचा तपशील अहवालात आहे. अहवाल चौकशी समितीकडे पाठविला आहे. अहवालाचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे समजते.खासगी रुग्णालयांमध्येच अधिक शस्त्रक्रिया
सरकारींच्या तुलनेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. त्यात बीड शहरातील ७, केजमधील १ आणि इतर ठिकाणची दोन रुग्णालये असल्याचे सांगण्यात आले. या १० खासगी रुग्णालयांमध्येच जवळपास ६ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षण केलेल्या ८२ हजार ९०० महिलांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यात आली आहे.