गेवराई/गढी : हैदराबादहून औरंगाबादकडे गुटखा घेऊन जणारा टेम्पो पोलीस अधिक्षकांच्या पथकाने बुधवारी पहाटे पाडळसिंगीजवळ पकडला. यामध्ये तब्बल ३७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षकांच्या पथक बुधवारी रात्री गेवराई तालुक्यात गस्त घालत होते. याचवेळी पथक प्रमुख कैलास लहाने यांना टेम्पोमधून (एमएच०३ सीटी ५५८१) औरंगाबादकडे गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पाडळसिंगीजवळील एका पेट्रोलपंपाजवळ सापळा लावला. या सापळ्यात हा चालक अलगद अडकला.
पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये तब्बल ३७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ वाहन व दीपक वाघमारे (मुंबई) या चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कैलास लहाने, पोह. पी.टी.चव्हाण, तुळशिराम जगताप, पोना विठ्ठल देशमुख, गणेश जगताप, संजय चव्हाण, विजय पवार, जयराम उबे आदींनी केली.