ठळक मुद्देमराठा आरक्षण : ठिकठिकाणी रास्ता रोको; कडकडीत बंद; वाहनांवर दगडफेक करून रोष व्यक्त; सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठा आरक्षणासाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर बुधवारी दुपारीपासून सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केज शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलकांनी रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी बससह वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.तेलगाव चौकात रास्ता रोकोधारूर तालुक्यातील तेलगाव येथील शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजता एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी धारूर तहसीलचे नायब तहसीलदार हजारे यांना मराठा आरक्षण संदर्भात मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी तेलगाव परिसरातील मोठया प्रमाणात मराठा बांधव या रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे हे फौजफाट्यासह बंदोबस्तावर होते.
माजलगावात मुंडण करुन निषेधमाजलगाव येथे शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. परभणी फाटा येथे हे आंदोलन पार पडले. काही कार्यकर्त्यांनी खाजगी वाहनावर दगडफेक करुन संताप व्यक्त करण्यात आला होता.तसेच तहसील कार्यालयासमोर मुंडण करुन सरकारचा निषेध केला. जमाव वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. आंदोलनास दलित, मुस्लिम, ओबीसी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शेकडो समाजबांधव यामध्ये सहभागी झाले होते.‘मराठा, मुस्लिम व धनगर समाजालाही आरक्षण मिळावे’अंबाजोगाई : येथील उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी मराठा समाजाची सद्य परिस्थिती विषद केली. मराठा समाजासोबतच मुस्लिम व धनगर समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे व इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी देशमुख यांनी केली. यावेळी सकल मराठा समाजाचे व सर्वधर्मिय समाज बांधव यांची उपस्थिती होती.लोखंडी सावरगाव, केजमध्ये बसवर दगडफेकशुक्रवारी पहाटे २.१५ वाजता अमरावती- पंढरपूर ही बस नेहमीप्रमाणे पंढरपूरला जात होती. ती लोखंडी सावरगावला संभाजी चौकात आली. यावेळी अज्ञात पाच ते सहा माथेफेरूंनी बसवर दगडफे केली. यामध्ये १२ हजार रुपयांचे नुकसान करून फरार झाले. अचानक दगड फेकल्याने बसचे चालक, वाहक व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर चालकाने बस थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली. बस चालक पवन तुळशीराम रेळे यांचे फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मोर्चा व रास्ता रोको आंदोलनानंतर केज बसस्थानकातून कळंबकडे जात असलेल्या माजलगाव-कळंब बसवर (एमएच-२० बीएल-०८२४) कानडी चौकात अज्ञाताने दगड फेकून मारला. यात बसचे अंदाजे १५ हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. बसचालक लक्ष्मण भगवान बांगर यांच्या फिर्यादीवरून ठाण्यात नोंद झाली.