- दीपक नाईकवाडे
केज (जि. बीड) : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील २५ गावांतील सहा हजार शेतकऱ्यांनी २०१६-१७ मधील खरीप हंगामात भरलेल्या पीक विम्यापोटी जवळपास सातशे शेतकऱ्यांच्या खात्यात युनायटेड इन्शुरन्स कंपनीने एक ते पाच रु पये वर्ग करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तालुक्यातील नांदुरघाटसह दैठणा, दरडवाडी, ढाकणवाडी, धोत्रा एकुरका, गदळ्याची वाडी, वाघेबाभळगाव, राजेगाव, मुंडेवाडी, खाडेवाडी, लिंबाची वाडीसह परिसरातील पंचवीस गावांतील सहा हजार शेतकऱ्यांनी २०१६-१७ मधील खरीप हंगामातील पिकांसाठी आॅनलाईन पद्धतीने युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला होता. यापैकी १५०० शेतकऱ्यांना कं पनीने विमा मंजूर केला. हा विमा तीळ पिकासाठी लागू झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी एक एकरपासून हेक्टरभर क्षेत्रात तिळाची पेरणी करून पीक विम्यापोटी हजारो रु पयांचा भरणा केला. मात्र, विमा कंपनीने जवळपास ७०० शेतकऱ्यांच्या खात्यात एक रु पया, दोन रु पये व पाच रु पये जमा केले. ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता ही धक्कादायक माहिती हाती आली.
विमा कंपनीने आमच्या खात्यात एक ते पाच रु पयांची रक्कम कोणत्या निकषांवर जमा केली, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. विमा कंपनीने आॅनलाईन अहवाल भरताना चुकीची माहिती भरल्याने कमी विमा लागू झाल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. ९१ आर क्षेत्राचा पीक विमा भरला. मात्र, एक रु पया आला असल्याचे महानंदा महादेव जाधव यांनी सांगितले.
शेतकरी काय म्हणतात : आई शकुंतला, भाऊ संतोष जाधव व माझ्यासह तिघांच्या खात्यावर १२ हजार रु पये खरिपाचा विमा भरला. त्यापैकी एक हेक्टर तिळाचा विमा भरला होता. आई व भावाच्या खात्यावर एक एक रु पयाच विमा आला.
- शंकर जाधव, नांदूरघाट
आईच्या नावे १ हेक्टर १२ आर तर वडिलांच्या नावे १ हेक्टर १२ आर व माझ्या नावावरील एक हेक्टरचा पीक विमा भरला, तसेच कुटुंबातील दहा जणांच्या नावे विमा भरला. मात्र दहाही सदस्यांच्या नावे एक रु पया जमा झाला आहे. - रजनीकांत खाडे, नांदुरघाट
पत्नी, मुलांसह कुटुंबातील एकूण चौघांच्या खात्यावर दहा हेक्टरमधील पिकांसाठी १० हजार १५६ रुपयांचा विमा भरणा केला होता चौघांच्या खात्यात विम्यापोटी एक एक रु पया आला. हा विमा कोणत्या निकषांवर लागू केला याचा खुलासा कंपनीने करावा. - नंदकुमार मोराळे, नांदुरघाट
कुटुंबातील तीन सदस्यांच्या १२ हेक्टर जमिनीतील पिकासाठी दहा हजार रु पयांपेक्षा अधिक पीक विमा भरला. त्यात एक एकर तिळाचाही विमा भरला होता. विमा कंपनीने तीळ कापणीचा प्रयोगही माझ्या शेतात केला. त्यावेळी पीक कापणीची नोंद स्पॉटवर बरोबर केली मात्र अहवाल चुकीचा दिला गेला.- बाबूराव सांगळे, शिरूरघाट
सहा एकर जमिनीतील पिकांसाठी पत्नी शकुंतला संतोष जाधव यांच्या नावे १५०० रु पये व माझ्या नावावरील जमिनीत पिकांसाठी १८०० रु पये, असे विम्यापोटी भरूनही दोघांच्या नावे एक एक रु पया आला.- संतोष जाधव, नांदुरघाट
विम्यापोटी बँकेत पैसे भरूनही खात्यात एक रु पया देऊन विमा कंपनीने आमचा अपमान केला. हा विमा कसा दिला याचा खुलासा कंपनीने करावा. - लक्ष्मीबाई मोराळे, नांदुरघाट
दोन हेक्टर पिकांच्या विम्यापोटी हजारो रु पये भरूनही खात्यात एक रु पया आला. हा विमा काय हेच समजेना. - अशोक मुळे, पिट्टीघाट