बीड : तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे तीव्र होत असताना मागील चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, बाजरी तसेच भाजी पिकांचे नुकसान झाले. असे असलेतरी काही प्रमाणात चारा, पाण्याच्या टंचाईतून सुटका होणार आहे. जिल्ह्यात चार दिवसात सरासरी १६.५ मिमी पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली.
गुरूवारी जिल्ह्यातील धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.धारूर तालुक्यातील सोनीमोहा, अंबेवडगाव, चौंडी, धुनकवड परीसरात मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तर धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील लेंडी नदीला पूर आला.तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील फळबागांना फटका बसला. वीज कोसळून एक महिला ठार झाली तर एक मुलगा जखमी झाला. परळी तालुक्यात मागील चार दिवसात गाय, बैल, म्हैस पशुधन वीज पडल्याने दगावले. गुरूवार आणि शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातही अवकाळीमुळे शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.
असा झाला चार दिवसात पाऊसतालुका- एकूण पाऊस (सरासरी मिमी)बीड - १२.२पाटोदा- ६.९आष्टी- २.६गेवराई- १४.१माजलगाव- १६.२अंबाजोगाई - २९.२केज- १४.४परळी- ४०.२धारूर- ४५.६वडवणी- १५.४शिरूर कासार- १.०एकूण सरासरी - १६.५ मिमी.
चारा- पाण्याची तात्पुरती सोयअवकाळी पावसामुळे मागील पंधरवड्यात वाढलेला उष्णतेचा पारा काहीसा कमी झाला. या पावसामुळे धारूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच येत्या काही दिवसात उगवण होणाऱ्या चाऱ्याची सोय होणार आहे. परंतू ही सोय काही दिवसांपुरतेच राहील असा अंदाज आहे.