बीड : भाजप-शिवसेना युतीच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी १८ मंत्र्यांचा समावेश केला. यात सेनेचे ९, तर भाजपच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळात भाजपकडून बीड जिल्ह्याला प्रथमच डावलण्यात आले आहे. यामुळे भाजप समर्थकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. प्रमोद महाजन यांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची देशभरात ओळख आहे. जेव्हा जेव्हा भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत आले तेव्हा बीड जिल्ह्याला केंद्रासह राज्यातही मुंडे, महाजनांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. मुंडे-महाजनांमुळे बीडसह राज्यात भाजपची पाळेमुळे रोवली गेली आहेत. यामुळे आजही बीड जिल्ह्याची भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमधून भाजपचाच खासदार निवडून आलेला आहे. सध्याही भाजपच्या प्रीतम मुंडे या खासदार आहेत.
गतवेळी भाजप-सेना युतीच्या मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपद मिळाले होते. यावेळी त्यांचा परळीतून त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पंकजा मुंडे या भाजपच्या मास लीडर आहेत. त्यांना राज्यसभा, विधान परिषदेवर संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु त्यांना दरवेळी डावलण्यात आले. सत्तांतरानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. परंतु १८ जणांच्या यादीत एकाही महिलेला संधी मिळाली नाही. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे परळी, माजलगाव, बीड, आष्टी असे चार, तर गेवराई, केजमध्ये भाजपचे आमदार आहेत. आगामी काळात भाजपला बीडमध्ये पुन्हा वर्चस्व करायचे असेल तर पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात बीडला संधी द्यावीच लागेल अन्यथा भाजपची पिछेहाट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.
बीडमध्ये तीन आमदारजिल्ह्यात ६ पैकी २ आमदार भाजपचे आहेत. यात गेवराईचे लक्ष्मण पवार हे दोन वेळा आमदार झाले आहेत. केजमधून नमिता मुंदडा या आमदार आहेत. तर विधान परिषदेवर आष्टीचे सुरेश धस हे भाजपकडून आमदार आहेत. सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यमंत्रिपद भोगले आहे. या तिघांपैकी सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही नावे चर्चेत होती.
पंकजा मुंडे यांचे ट्वीटनवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदयांचे अभिनंदन.. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहात आहे आपल्याकडे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा. विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्वजण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल, अशी शुभकामना.., अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे.