लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा क्रीडा कार्यालयात केवळ बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते ही विविध कामानिमित्त बाहेर पडल्याने कार्यालय रामभरोसे असते. सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. केवळ एक शिपाई गेटवर राखणदारी करीत होता. यावरुन क्रीडा कार्यालयातील कारभाराचा ‘खेळ’ कसा सुरु आहे हे दिसून येते.
जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपडे हीच्याविरुद्ध शिपायामार्फत ८० हजार रुपये लाच घेतल्याच्या आरोपावरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कार्यालयात केवळ क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर हे एकमेव शिल्लक राहिले. दोन क्रीडा मार्गदशक व एक वरिष्ठ लिपीक एवढेच कर्मचारी कार्यालयात कार्यरत आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास कार्यालयात एकही जण हजर नव्हता. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक शिपाई राखणदारी करत असल्याचे दिसून आले.
क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर हे सामाजिक न्याय विभागात कार्यालयीन कामकाजासाठी गेले होते. क्रीडा मार्गदर्शक अजय पवार व संतोष वाबळे हे दोघे कामानिमित्त बाहेर पडल्याचे समजले. तर वरिष्ठ लिपीक चांदवडे हे सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. हे सर्वच विविध कारणांनी बाहेर पडल्याने कार्यालयात कोणीच शिल्लक राहत नाही हे सिद्ध झाले. विविध कामांसाठी आल्यानंतर ताटकळत बसावे लागत आहे.
डीएसओचे पद रिक्तचनंदा खुरपुडे एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद रिक्त झाले. १५ दिवसाचा कालावधी उलटूनही अद्याप इतरांकडे याचा अतिरिक्त पदभार सोपविलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबत आहेत. वरिष्ठांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. या पदासाठी क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर व क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
कामकाज ढेपाळलेखुरपुडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयीन कामकाजच ढेपाळले होते. वारंवार तक्रारी करुनही वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले. याचा फटका सर्वसामान्यांना बसला. अद्याप या कामकाजात सुधारणा झालेली नाही. कार्यालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच क्रीडाप्रेमी व खेळाडूंना सुविधा देण्यासाठी येथे तात्काळ कर्तव्यदक्ष कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.