बीड : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावच्या रूग्णालयात कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी ब्लॅक लिस्ट असतानाही नाशिकच्या कंपनीला कंत्राट दिले. तसेच याच कंपनीने उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना निलंबीत करण्यात आले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गुरूवारी विधान परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणात डॉ.साबळे यांचा संबंध नसतानाही कारवाई झाल्याने बीडकरांनी संताप व्यक्त करत आंदोलनाची तयारी दर्शवली आहे.
बीड जिल्हा रूग्णालयांतर्गत लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्र, स्त्री रूग्णालय आणि परिचारीका प्रशिक्षण केंद्र येते. या ठिकाणी बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे गट क व ड संवर्गातील ८० कर्मचाऱ्यांची पदभरती केली जाणार होती. यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुपला हे कंत्राट दिले. यातील ६० लोकांना नेमणुकाही देण्यात आल्या होत्या. परंतू ही भरती करताना कंत्राटदाराने जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केल्याचा अरोप करण्यात आला होता. याबाबत केजच्या आ.नमिता मुंदडा आणि बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर संचालकांनी चौकशी केली.
हाच मुद्दा गुरूवारी अधिवेशनात विधान परिषद सदस्य गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी डॉ.साबळे यांना निलंबीत करणार असल्याची घाेषणा केली. याबाबत जिल्हा शल्य चिकत्सक डॉ.साबळे यांना दोन वेळा संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न उचलल्याने बाजू समजली नाही.
कारवाई चुकीची; बीडकर करणार आंदोलनकंत्राट दिल्यानंतर एखादी कंपनी पैसे घेत असेल तर त्याची चौकशी करून कंपनीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच ज्या पुढाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले, त्यांची नावेही उघड करण्यात आली नाहीत. या सर्व बाबींची खात्री न करताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांना दोषी ठरवत थेट निलंबणाची कारवाई करणे चुकीचे आहे. हाच मुद्दा धरून आता सामाजिक कार्यकर्ते, युवकांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सोशल मिडयावरही 'वुई सपोर्ट सुरेश साबळे' अशी टॅग लाईन देत अनेकांनी पोस्ट व्हायरल केल्या.