बीड : घरबसल्या ‘ई-संजीवनी’द्वारे वैद्यकीय उपचार देण्यात बीड जिल्हा राज्यात अव्वल राहिला आहे. आतापर्यंत ४ हजार १८४ लाेकांना औषधांसह आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे उपचार नि:शुल्क असतात. या योजनेचा आणखी प्रचार व प्रसार करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत.
घरबसल्या वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-संजीवनी’ योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून टेली मेडिसिन अर्थात, ऑनलाइन पद्धतीने वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अनास्था दाखविण्यात आली होती. ताप, सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांवर वैद्यकीय उपचार मिळत नव्हते. त्यामुळे ई-संजीवनी या नावाने ऑनलाइन वैद्यकीय उपचार उपलब्ध देण्यात आले. याचा बीड जिल्ह्यात सर्वाधिक लाभ घेण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, जिल्हा शल्य चिकित्सकांतर्गत १८ आरोग्य संस्था आहेत. येथे नियमित ओपीडी व आयपीडी काढली जात आहे, परंतु या संस्थांव्यतिरिक्तही ‘ई-संजीवनी’ ही सुविधा अधिक लाभदायक आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, नोडल ऑफिसर डॉ.अजय राख यांनी केले आहे.
‘सीएचओं’ची भूमिका महत्त्वाची
‘ई-संजीवनी’मध्ये ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत, अशांना आरोग्यवर्धिनी केंद्रात पाठविले जाते. येथील समुदाय आरोग्य अधिकारी त्यांच्यावर उपचार करून आरोग्य केंद्रात व अतिगंभीर असल्यास उपजिल्हा अथवा जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. या सीएचओंना जिल्हास्तरावरून नियमित व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले जाते. नोडल ऑफिसर डॉ.अजय राख, संदीप जोगदंड हे माहिती सांगतात.
मराठवाड्यातील केवळ नांदेडचा समावेश
राज्यात बीड अव्वल असून, त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. राज्यात पाचव्या स्थानी नांदेड आहे. २ हजार ३३२ लोकांना या जिल्ह्यात उपचार करण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानी अहमदनगर असून, तिसऱ्या सोलापूर जिल्हा आहे.
कोट
‘ई-संजीवनी’ ही योजना खूप लाभदायक आहे. घरबसल्या सर्वांनी उपचार घ्यावेत. येथे वैद्यकीय तज्ज्ञांकडून औषधी सल्ल्यांसह मार्गदर्शनही केले जाते. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. आमच्याकडूनही याचा प्रचार आणि प्रसार करण्यावर भर दिला जात आहे.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
===Photopath===
190321\192_bed_6_19032021_14.jpeg
===Caption===
ई-संजीवनीची माहितीचा आढावा घेताना नोडल ऑफिसर डॉ.अजय राख